निसर्ग राघवेंद्र सोसायटी, मोशी येथील मेन गेट परिसरात पैशांनी भरलेले पाकीट आढळून आल्यानंतर डीडी मॅनपावर सर्विसेसचे सिक्युरिटी कर्मचारी कृष्णकांत दातार यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सोसायटीतील रहिवाशांकडून कौतुक करण्यात आले.
मेन गेट परिसरात ड्युटीवर असताना कृष्णकांत दातार यांना पैशांनी भरलेले पाकीट सापडले. पाकिटात पैसे असल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या लालसेला बळी न पडता पाकिटाच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर पाकीट जसेच्या तसे मालकाच्या स्वाधीन करण्यात आले. दातार यांच्या या कृतीतून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन घडले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल निसर्ग राघवेंद्र सोसायटीतील रहिवाशांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. “प्रामाणिकपणा आणि माणुसकी हीच खरी संपत्ती आहे,” अशा शब्दांत कृष्णकांत दातार यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. सुरक्षेची जबाबदारी पार पाडतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दातार यांच्या या कृतीमुळे प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर निर्माण झाला आहे.


