भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीएमटी चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या टपऱ्यांवर भोसरी पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने संयुक्त कारवाई केली. नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरातील काही पान व खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांजवळ खुलेआम दारू पिण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला प्रोत्साहन मिळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच यामुळे कायदा आ

णि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी महापालिकेच्या पथकासोबत विशेष मोहीम राबवली.
१६ सप्टेंबर २०२६ रोजी पीएमटी चौक परिसरातील विविध टपऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी अतिक्रमण करून तसेच अनधिकृतपणे सुरू असलेल्या एकूण १८ टपऱ्यांवर कारवाई करून त्या निष्कासित करण्यात आल्या. दरम्यान, १ जानेवारी २०२६ पासून १६ सप्टेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्या व्यक्तींविरोधात एकूण १७९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे पीएमटी चौकातील अनधिकृत व्यवसायांना आळा बसण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रकारांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारांविरोधात पुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी संबंधित प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन भोसरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.


