कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही जागा आरक्षित होती. या जागेसाठी रेखा चौधरी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे निवडणूक न होता थेट त्यांचा विजय जाहीर होणार आहे. याबाबत निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 क मधूनही भाजपच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. मतदान होण्याआधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. भाजपकडून त्यांच्या विजयाकडे हिंदुत्वाचा पहिला विजय म्हणून पाहिले जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी सामाजिक आणि संघटनात्मक काम केले असल्याने त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या महानगरपालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
अधिक वाचा…
राष्ट्रवादीकडून प्रभाग क्र. ७ मध्ये विराज लांडे मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल



