पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात उद्या, १५ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार ही रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून दुपारी ३ वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. गंगानगर, महेशनगर, ॲटलॉस कॉलनी, डी.वाय. पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल आणि आचार्य अत्रे रंगमंदिर या मार्गाने रॅलीचा सुमारे तीन किलोमीटरचा प्रवास होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत रॅलीची सांगता होऊन त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीसाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रविजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे, गटनेते प्रशांतजी शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, “तिरंगा हा देशाच्या स्वाभिमानाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्राला अभिवादन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरातील शेकडो कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन भोसले यांनी केले. रॅलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना माहिती देण्यात आली असून, एक हजाराहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


