राजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक निर्णायक टप्प्यावर

"कासरवाडी परिसरात सध्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचे चित्र आहे" -रश्मी लांडे

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २० मध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. गुरुवारी (८ तारखेला) कासरवाडी परिसरात भाजपाचा जोरदार प्रचार पाहायला मिळाला. भाजपाच्या प्रचाराची ‘तोफ’ कासरवाडीत धडाडली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले होते.

या प्रचार फेरीत भाजपाचे चारही उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसून आले. प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले. याच वेळी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या उमेदवार रश्मी लांडे यांनी ‘जन महापर्व’शी संवाद साधला.

यावेळी बोलताना रश्मी लांडे म्हणाल्या, “कासरवाडी परिसरात सध्या नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक नागरिक आम्हाला स्पष्टपणे सांगत आहेत की, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत.’” त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “माजी नगरसेवक काही विकासकामांचे श्रेय घेत आहेत. मात्र कासरवाडीतील संबंधित शाळा भाजपाच्या कार्यकाळातच उभी राहिली आहे. हे वास्तव जनतेसमोर येणे गरजेचे आहे,” असेही त्या म्हणाल्या.

या वक्तव्यामुळे प्रभाग २० मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपाचा आक्रमक प्रचार सुरू असताना, दुसरीकडे विरोधी पक्षही रणनीती आखताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रभागात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

एकूणच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग २० महत्त्वाचा ठरणार असून, पुढील काही दिवसांत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या प्रचाराला तुफान गर्दी! 
माधुरी मुटकेंसाठी शिवसेना आमदार शरद सोनवने मैदानात!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button