पिंपरी चिंचवड

महिला सफाई कर्मचाऱ्यांवर नाईट शिफ्ट लादली; महापालिकेचा निर्णय वादात!

नाईट शिफ्टवरून महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांसाठी नाईट शिफ्ट सुरू करण्याच्या निर्णयामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या नाईट शिफ्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे राज्यातील सत्ताधारी महिला सक्षमीकरणाचा गवगवा करत ‘लाडकी बहीण’ अशी संबोधने देत असताना, दुसरीकडे महापालिकेचा हा निर्णय महिलांवर अन्याय करणारा असल्याची टीका होत आहे.

जन महापर्व या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एका महिला सफाई कर्मचाऱ्याने आपली व्यथा मांडली. “मी राजगुरूनगर येथून भोसरीपर्यंत कामासाठी येते. मला प्रवासासाठी जवळपास दोन तास लागतात. माझे पती आजारी असून घरी दोन लहान मुले आहेत. अशा परिस्थितीत नाईट शिफ्ट करणे माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. ही नाईट शिफ्ट तात्काळ बंद करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

महिला कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की नाईट शिफ्ट लावूनही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे नाईट अलाऊन्स किंवा वेतनवाढ देण्यात आलेली नाही. आधीच अल्प वेतनावर काम करणाऱ्या महिलांवर अतिरिक्त ताण टाकण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रात्री-अपरात्री कामावर ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, सुरक्षिततेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सध्याच्या काळात राज्यभरात गुन्हेगारी, छेडछाड, बलात्कार यांसारख्या घटना वाढत असताना महिलांना रात्रीच्या वेळी कामावर बोलवणे हा अतिशय धोकादायक निर्णय असल्याचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांचे मत आहे. महापालिकेने हा निर्णय घेताना महिलांच्या सामाजिक, कौटुंबिक आणि सुरक्षिततेच्या बाबींचा विचार न केल्याचा आरोप होत आहे.

या निर्णयाविरोधात महिला कर्मचारी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, महापालिकेने तात्काळ नाईट शिफ्टचा निर्णय मागे घ्यावा किंवा महिलांसाठी विशेष सुरक्षा, वाहतूक सुविधा व आर्थिक भत्ते द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…
प्रभाग क्र. ०२ मध्ये बुद्धविहारावरून बौद्ध समाज आक्रमक 
पिंपरी चिंचवड प्रभाग 24 मध्ये भाजप–शिंदे गटाला धक्का; 5 उमेदवारांचे अर्ज बाद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button