पिंपरी-चिंचवड प्रभाग 08 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!
धनुष्यबाणावर लढणाऱ्या उमेदवारांच्या रॅलीने राजकीय वातावरण तापले
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली असून सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 08 सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात शिवसेना शिंदे गटाने बालाजीनगर परिसरात भव्य शक्तीप्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवले आहे.
धनुष्यबाण या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माधुरी मुटके आणि महेंद्र सरोदे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. परिसरात ठिकठिकाणी फुलांची उधळण, ढोल-ताशांचे निनाद आणि घोषणा देत उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या रॅलीमध्ये माधुरी मुटके यांचे पती तसेच शिवसेना नेते निलेश मुटके यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. यावेळी बोलताना माधुरी मुटके म्हणाल्या, “जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. नागरिक निश्चितच आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.” त्यांनी विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याचे आश्वासन दिले.
निलेश मुटके यांनीही नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “प्रभाग क्रमांक 08 मधील जनता ही ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील, अशी आम्हाला खात्री आहे. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” त्यांनी विरोधकांवर टीका करत शिवसेनेच्या कार्यकाळातील कामगिरी अधोरेखित केली.
दरम्यान, उमेदवार महेंद्र सरोदे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “आजपर्यंत स्थानिक नगरसेवकांनी जनतेसाठी ठोस कामे केली नाहीत. त्यांनी कुटुंबे उद्ध्वस्त केली, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले, रोजगारनिर्मिती केली नाही.” अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
एकूणच प्रभाग क्रमांक 08 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण सुसाट सुटल्याचे चित्र दिसत आहे. या शक्तीप्रदर्शनामुळे राजकीय समीकरणे बदलणार का, आणि विरोधक या वेगवान प्रचारासमोर कसे तोंड देणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा…
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक निर्णायक टप्प्यावर
प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या प्रचाराला तुफान गर्दी!



