पिंपरी-चिंचवड प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) ‘दोन वाघिणी’ प्रचारसभेत जोरदार हल्लाबोल
सुलक्षणा शिलवंत-धर आणि निलम म्हात्रे यांचे दमदार प्रदर्शन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून, सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. १२ जानेवारी रोजी या प्रभागात विविध पक्षांच्या सभांचा धडाका पाहायला मिळाला. याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचीही जोरदार प्रचारसभा पार पडली.
तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या सुलक्षणा शिलवंत-धर आणि निलम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणांमध्ये ही रॅली काढण्यात आली असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाची भूमिका मांडत सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या कार्याची प्रशंसा केली. “सुलक्षणा शिलवंत यांना भविष्यात पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येईल,” असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना सुलक्षणा शिलवंत-धर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “समोरच्या उमेदवाराच्या भावावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तोच भाऊ प्रभागातील नागरिकांकडे जाऊन ‘माझ्या भावाला मतदान दिले नाही तर तुम्हाला घर मिळणार नाही’ अशा प्रकारची धमकी देत आहे. प्रभागात दहशत आणि गुंडगिरी माजवली जात आहे,” अशा रोखठोक शब्दांत त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले.
दरम्यान, उमेदवार निलम म्हात्रे यांनी आपल्या खास शैलीत मतदारांशी संवाद साधला. “खा कुणाचंही मटण, पण तुतारीचं बटण दाबा,” असे म्हणत त्यांनी आपल्या मनमोकळ्या स्वभावाची झलक दाखवली आणि उपस्थितांमध्ये हास्य व टाळ्यांचा कडकडाट झाला.
एकूणच प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ‘दोन वाघिणी’ चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, ही लढत अधिकच रंगतदार होत चालल्याचे चित्र दिसत आहे. आगामी मतदानात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
पिंपरी-चिंचवड प्रभाग २० मध्ये भाजपची जोरदार प्रचारसभा!
पिंपरी-चिंचवड प्रभाग 08 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!



