प्रभाग क्र. ०२ मध्ये बुद्धविहारावरून बौद्ध समाज आक्रमक
महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखवण्याचा स्थानिकांचा इशारा!
गेल्या दहा वर्षांपासून मोशीतील जाधववाडी परिसरात बौद्धविहाराच्या प्रश्नावरून वाद सुरू असून, हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. स्थानिक बौद्ध समाजासाठी श्रद्धेचे आणि सामाजिक एकतेचे केंद्र असलेल्या या बौद्धविहारावर अनधिकृत असल्याचे कारण देत महापालिकेने कारवाई केल्याचे सांगितले जाते. या कारवाईमुळे परिसरातील बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बौद्धविहार पाडण्यात आल्यानंतर तत्कालीन माजी महापौरांनी संबंधित नागरिकांना आश्वासन दिले होते की, त्यांना दुसऱ्या ठिकाणी योग्य जागा उपलब्ध करून देऊन नव्याने बौद्धविहार उभारून दिला जाईल. मात्र, त्या आश्वासनाला जवळपास दहा वर्षे उलटून गेली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे बौद्ध समाजामध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत चालली आहे.
या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, बौद्धविहार हा केवळ धार्मिक स्थळ नसून तो सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र आहे. विहार नसल्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करण्यात अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम समाजाच्या एकतेवर आणि पुढील पिढीच्या संस्कारांवर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक बौद्ध समाजाने अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा केला, निवेदन दिली, तसेच लोकप्रतिनिधींना भेटून आपली व्यथा मांडली. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा वेळेत कार्यवाही न झाल्याने आता नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर, येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. बौद्धविहाराचा प्रश्न सुटला नाही, तर मतदानातून रोष व्यक्त केला जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे. हा प्रश्न केवळ एका परिसरापुरता मर्यादित नसून, तो धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि प्रशासनाच्या जबाबदारीशी निगडित असल्याचे नागरिकांचे मत आहे.
एकूणच, मोशीतील जाधववाडी येथील बौद्धविहाराचा प्रश्न आता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला असून, प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
पिंपरी चिंचवड प्रभाग 24 मध्ये भाजप–शिंदे गटाला धक्का; 5 उमेदवारांचे अर्ज बाद!
मतदानाआधीच भाजपने बाजी मारली!



